चला मुलांनो आज करू या
निर्धार पक्का झाडांशी
सगळे मिळूनी झाडे लावू या.
धरतीचे ऋण फेडू या. १
पर्यावरणाच्या समतोलाचे
महत्त्व आपण जाणू या
विज्ञानाची कास धरूनी
शास्त्र आपण समजून घेऊ या.२
जीवन जगणे सार्थ करू या
फळाफुलांशी नाते जोडू या.
वसुंधरेला सजवायाला
पावसाला गवसनी घालू या. ३
आसुसलेली धरा ही आपली
घेऊन थेंबाला कवेत
नवाकुंराचे बीज लपविते
काळ्या मातीच्या उदरात. ४
होते भरभराट पिकाफळांची
बळीराजाच्या मेहनतीला
आनंदाचे उधाणं येई
किंमत मिळे तेव्हा मालाला..५
नटलेली वसुंधरा दिसे
मखमली हिरवा शालू लेऊनि
सजते नव्या नवरीसारखी
लाल,पिवळ्या पानाफुलांनी .६
निसर्गाची ही किमया
प्रीतीला देते जगण्याची आशा
फुलांच्या या सुवासाने
मनी जागतात जीवनाच्या नव्या दिशा...७
चला मुलांनो आज करू या
निर्धार पक्का झाडांशी...
✍️©®अनिता कळसकर
कल्याण
No comments:
Post a Comment